मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी फडनवीस यांनी प्रधानमंत्र्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ मूर्ती भेट म्हणून दिली. देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी महाराष्ट्र महत्त्वाचं राज्य असल्याचं सांगत, राज्याच्या प्रगतीसाठी केंद्र सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन प्रधानमंत्र्यांनी दिलं असल्याचं फडनवीस यावेळी म्हणाले.
या दोन दिवसीय दौऱ्या दरम्यान मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, तसंच आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे.पी. नड्डा यांच्याही सदिच्छा भेटी घेतल्या. या भेटीमध्ये राज्याच्या विकासासाठी विविध योजनांवर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं.