राज्यभरात सौर उर्जेचा वापर करणारी सौर ग्राम तयार करण्यात येत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार असून भविष्यात या हरित उर्जेच्या माध्यमातून राज्यातले शेतकरी दुसरी हरित क्रांती घडवतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प 2.0 अंतर्गत वाशिम जिल्ह्यातल्या उंबरठा आणि धाराशिव जिल्ह्यातल्या नारंगवाडी या गावातल्या प्रकल्पांचं लोकार्पण दूरदृश्य प्रणालीद्वारे करताना ते बोलत होते. शेतकऱ्यांना 16 हजार मेगावॅट इतकी वीज पुरवणारे सर्व फीडर सौरऊर्जेवर आणण्याचेंकाम सुरू आहे. टप्प्याटप्प्याने हे सर्व फिडर सौर उर्जेवर आणण्यात येतील. आणि शेतकऱ्यांना दिवसाही वीज उपलब्ध होऊ शकेल, असं मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक, ऊर्जा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आभा शुक्ला, यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. तसंच उंबरठा आणि नारंगवाडी गावातले शेतकरी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.