नागपूरमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या दंगलीत सर्वसामान्यांच्या मालमत्तेच्या नुकसानीची भरपाई येत्या ३-४ दिवसात देण्याच्या सूचना दिल्या आहेत. दंगलीमध्ये ७१ वाहनांचे तसेच विविध मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीची सर्व रक्कम दंगेखोरांकडून वसूल केली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. नागपूर शहरातल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतल्यानंतर ते बोलत होते.
नागपूर शहराच्या अकरा पोलीस स्टेशनच्या परिसरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहे. लवकरच यात शिथिलता आणू असं आश्वासन त्यांनी दिलं. दंगल प्रकरणी 13 गुन्हे दाखल झाले असून 104 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी 12 विधी संघर्षग्रस्त बालक आहेत. दंगल भडकविण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या विविध समाज माध्यमांवरील 250 पोस्ट टाकणाऱ्या 62 लोकांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आल्या असून दोघांना अटक केल्याची माहिती त्यांनी दिली.
आगामी सण आणि उत्सवाच्या काळात शांतता भंग होणार नाही यादृष्टीने सहकार्य करण्याचं आवाहन त्यांनी जनतेला केलं. तसेच शांतता भंग करणाऱ्यांविरुद्ध तात्काळ कठोर कारवाई करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी पोलिसांना दिले.