चीलीचे राष्ट्राध्यक्ष गेब्रिएल बोरिक फॉन्ट आजपासून पाच दिवसांच्या भारत भेटीवर आहेत. त्यांच्या बरोबर उच्चस्तरीय शिष्टमंडळही आहे; त्यामध्ये चिलीचे मंत्री, व्यावसायिक संघटनांचे प्रतिनिधी तसंच भारत आणि चिली दरम्यान सांस्कृतिक सहकार्यासाठी काम करणाऱ्या सदस्यांचा समावेश आहे. चिलीच्या राष्ट्राध्यक्षांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. ते आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. तसंच राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांचीही ते भेट घेणार आहेत. त्यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवन इथं मेजवानीचं आयोजन करण्यात आलं आहे. या दौऱ्या दरम्यान फॉन्ट आग्रा, मुंबई आणि बेंगलुरु या शहरांनाही भेट देणार आहेत. यावेळी ते राजकीय नेते, व्यावसायिक, औद्योगिक प्रतिनिधींची भेट घेणार असून विविध क्षेत्रातील स्टार्टअप्स आणि नवोन्मेषासाठी काम करणाऱ्या प्रतिनिधींशी चर्चा करणार आहेत. गेल्यावर्षी भारत आणि चिली दरम्यानचा द्विपक्षीय व्यापार एकंदर अडीच अब्ज अमेरिकन डॉलर्सचा होता. सध्या चिलीमध्ये भारतीय गुंतवणूक सुमारे ६२० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतकी आहे.