डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

मुख्यमंत्र्यांची मंत्रालयातील नियंत्रण कक्षाला भेट

मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या स्थितीचा सामना करण्यासाठी शासनाने विविध पावलं उचलली आहेत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत सांगितलं. मुंबईत निर्माण झालेल्या पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी झालेल्या बैठकीनंतर ते पत्रकारपरिषदेत बोलत होते. बैठकीला मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव सुजाता सौनिक, आदी उपस्थित होते. 

मुंबई आणि उपनगरात कालपासून आज सकाळी सात वाजेपर्यंत ३०० मिलीमिटर पावसाची नोंद झाली. या पावसामुळे मुंबईच्या सखल भागात पाणी साचलं असून रस्ते आणि  रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. पाणी उपसण्याचं काम सुरु असून  रेल्वे, महानगरपालिका आणि इतर यंत्रणा समन्वयाने परिस्थितीतून मार्ग काढत आहेत असं शिंदे यांनी सांगितलं. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात  अनेक ठिकाणी पावसामुळे पूरसदृश स्थिती उद्भवली असून तिथं राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची पथकं मदतीसाठी तैनात आहेत, असं ते म्हणाले. आपत्तीच्या वेळी राजकारण न करता सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलं. किनारपट्टीच्या सर्व जिल्ह्यांमधे उद्यापर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वेधशाळेनं व्यक्त केली असून त्यादृष्टीने आवश्यकता असेल तरच घरातून बाहेर पडावं आणि यंत्रणांना सहकार्य करावं, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा