नागपूर इथल्या मिहान प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवण्यासाठी तातडीने पावलं उचलण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक झाली.
मिहान प्रकल्पांतर्गत विकसित भूखंडासाठी आकारण्यात येणारं शुल्क योग्य असावं तसंच प्रकल्पाच्या निधीसाठी सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव बैठकीसमोर सादर करावा, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. मिहान परिसरातल्या ग्रामपंचायत क्षेत्रात बांधण्यात आलेली व्यापारी संकुलं ही त्या ग्रामपंचायतीना हस्तांतरीत करावी, यामुळे संबधित ग्रामपंचायतींना उत्पन्नाचे साधन उपलब्ध होईल. तसेच पुनर्वसन काळात मिहान भागातल्या ग्रामपंचायतींना पाठवलेले पिण्याच्या पाण्याचे बिल संबधित यंत्रणांनी कमी करावे,असे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले.