महाराष्ट्रात मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. पावसामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे आणि मदतीची कार्यवाही त्वरित करण्याची सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. पिकांचं नुकसान, घरांची पडझड, पशुधनाची हानी अशा सगळ्या नुकसानाची माहिती घेऊन लवकरात लवकर पंचनामे करावेत तसंच, पुरामुळे तात्पुरतं स्थलांतर केलेल्यांना आवश्यक सुविधा देण्यात याव्यात असे आदेश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
बीड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असून त्याचा फटका खरीप हंगामातल्या तूर, बाजरी, उडीद, कांदा, मूग या पिकांना बसला आहे. काही ठिकाणी फळबागा जमीनदोस्त झाल्या आहेत. शेतात पाणी साचल्यामुळे कापूस आणि सोयाबीन ही पिकं धोक्यात आली आहेत. जिल्ह्यातल्या ६११ गावांमधल्या १ लाख २५ हजार ७२४ शेतकऱ्यांचं २ लाख ३ हजार ४१५ हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झाल्याचा अहवाल कृषी विभागानं दिला आहे. धाराशिव जिल्ह्यात २८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या काळात झालेल्या संततधार पावसामुळे ६ हजार ६७ हेक्टर क्षेत्रावरच्या पिकांचं तर १७७ हेक्टर क्षेत्रावरच्या बागायतीचं नुकसान झाल्याचा अहवाल कृषी विभागानं दिला आहे.
यात उडीद, मूग, सोयाबीन, मका, कांदा, डाळिंब, पेरू, पपई या पिकांचं नुकसान झालं आहे.भंडारा जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून संततधार सुरू असल्याने बागायती शेतीचं नुकसान झालं आहे. मिरची, वांगी, कारले या पिकांचं नुकसान झालं असून कृषी विभागानं पंचनामे करून आर्थिम मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. मराठवाड्यातल्या बहुतांश जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांनी पावसामुळे झालेल्या नुकसानाची काल पाहणी केली.
दरम्यान, नांदेड जिल्ह्यात आता पूर ओसरला आहे. विष्णुपुरी प्रकल्पातून ६२ हजार २९४ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गोदावरी नदीची पाणीपातळीही ३५५ मीटरवरून ३५० मीटरवर आली असून आता नांदेड शहरातल्या सखल भागातलं पाणी ओसरत आहे. सातारा जिल्ह्यातलं कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे आज सकाळी सहा वक्र दरवाजे उघडून त्यातून विसर्ग करण्यात आला. वाशिम जिल्ह्यातल्या एकबुर्जी या प्रकल्पातही १०० टक्के पाणी भरलं असून त्यातून विसर्ग सुरू आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी येत्या काही दिवसात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
राज्यात यंदा जास्त पाऊस झाल्यामुळे साथीच्या आजारांचे रुग्णही वाढले आहेत. कॉलरा, गॅस्ट्रो, कावीळ, अतिसार या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग उपाययोजना करत आहे. प्रादुर्भावाची सर्वाधिक शक्यता असलेल्या गावांची यादी तयार केली जात आहे. जलजन्य आजारांमुळे यंदा जानेवारी ते ऑगस्ट या काळात राज्यात १० रुग्ण दगावल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे.