पाणमांजर, गिधाड, रानम्हैस यांच्या प्रजनन केंद्रासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. राज्य वन्य जीव मंडळाच्या आज मुंबईत झलेल्या बैठकीत हा निर्णय झाला. यावेळी पेंच इथं पाणमांजर, नाशिकमधे गिधाड, तर गडचिरोलीत रानम्हैस प्रजनन केंद्र उभारण्याविषयी चर्चा झाली. राज्यात दुर्मिळ होत असलेल्या वनस्पतींच्या जतन आणि संवर्धनावर भर देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. सातारा जिल्ह्यातल्या जावळीच्या जंगलात ५०० प्रकारच्या दुर्मिळ वनस्पती असल्याचं सांगत, त्याठिकाणी संशोधन आणि विकास केंद्र सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी संरक्षित क्षेत्र आणि पर्यावरण संवेदनशील क्षेत्र, व्याघ्र भ्रमण मार्गातल्या चार विकास प्रकल्पांना मान्यता देण्यात आली.
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबातल्या सदस्याला वनमजूर म्हणून सामावून घेण्याचा निर्णय देखील मुख्यमंत्र्यांनी घेतला. सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या शेतमजुरांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विम्यातून लाभ देण्याचे, तसंच सर्पदंशावर तात्काळ उपचार मिळावेत यासाठी क्लिनिक ऑन व्हील उपक्रम सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
गावांमध्ये वन्य प्राण्यांकडून होणारी पिकांची नासाडी रोखण्यासाठी पथक नेमतानाच, वनपाटील नेमण्याबाबतही या बैठकीत चर्चा झाली. वन मंत्री सुधीर मुनगंटीवार दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून बैठकीत सहभागी झाले होते.
‘एक पेड माँ के नाम’ हा उपक्रम राज्यातल्या सर्व महापालिका, नगरपालिका, शाळा, महाविद्यालयांमध्ये प्रभावीपणे राबवण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.