मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद पडावी म्हणून विरोधकांनी अनेक प्रयत्न केले, मात्र ही योजना कधीही बंद होणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. छत्रपती संभाजीनगर इथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचा सन्मान आणि विविध योजनांचा लोकार्पण सोहळा झाला, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. महिलांच्या संसाराला हातभर लावण्यासाठी माझी लाडकी बहीण योजना आणली, असं मुख्यमंत्री म्हणाले. सरकारने आतापर्यंत पिंक रिक्षा योजना, लेक लाडकी लखपती योजना, वयश्री योजना अशा अनेक लोककल्याणकारी योजना आणल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. कल्याणकारी योजनांचा लाभ घेऊन अनेक महिलांनी आपले व्यवसाय सुरू केले असून राज्यातल्या सर्व महिलांना लखपती करण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
राज्य सरकारने शेतकऱ्यांचं पुढच्या पाच वर्षांचं वीजबिल माफ केलं असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी सांगितलं. तसंच केवळ दहा टक्के भरून शेतकऱ्यांना सौर पम्प दिले जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
रक्षाबंधनाच्या ओवाळणीनंतर आता राज्यातल्या महिलांना भाऊबीजेची ओवाळणी मिळणार असल्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं. या कार्यक्रमाला महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे, माजी मंत्री भागवत कराड,मंत्री अब्दुल सत्तार,मंत्री अतुल सावे उपस्थित होते.