महाराष्ट्रातल्या बहिणींना आता कुणापुढे हात पसरण्याची गरज उरणार नाही, कारण त्यांच्या तीन भावांनी त्यांना आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न केलेला आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज साताऱ्यात केलं. महिला सशक्तीकरण अभियानात ते बोलत होते. काही सावत्र भाऊ या योजनेला विरोध करत न्यायालयात गेले आहेत, त्यांना उत्तर द्या, असं आवाहन त्यांनी केलं.
ही योजना थांबणार नाही, आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही दिलेला हा माहेरचा आहेर आहे, आमचं सरकार हे आमच्या बहिणींसाठी हक्काचं माहेर आहे, असं शिंदे यांनी सांगितलं. महिलांना एसटीच्या तिकिटात ५० टक्के आरक्षण दिल्यामुळे इतक्या बहिणींनी प्रवास केला, की तोट्यात असलेलं एसटी महामंडळ नफ्यात आलं आहे. शिवाय यामुळे बहिणींचा आत्मविश्वास वाढला आहे, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं.