मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृहात आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातल्या खरीप पिकांचा आढावा घेतला. शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, शेती नुकसान भरपाईसाठीच्या मदतीचं वाटप ३० जूनपर्यंत पूर्ण करावं, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले आहेत. सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करावी, शेतीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उपग्रह तंत्रज्ञानाचा वापर करावा, कृषी विद्यापीठांनी नवीन संशोधनावर भर द्यावा, ज्या भागात २५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे अशा भागात विशेष लक्ष केंद्रित करावं अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या.
या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, कृषी मंत्री धनंजय मुंडे, पणन मंत्री अब्दुल सत्तार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्यासह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.