मुख्यमंत्रिपदाच्या तिसऱ्या कार्यकाळात नदी जोड प्रकल्प आणि हरित ऊर्जेवर आपला भर राहणार असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते काल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होते. या निर्णयामुळे शेती आणि उद्योग क्षेत्राला लाभ होऊन, राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला, ते म्हणाले…
“मागच्या काळामध्ये एरिगेशन मिनिस्टर म्हणून, चार नदी जोड प्रकल्पांना मान्यता दिली आहे, हे प्रकल्प महाराष्ट्राला कायम दुष्काळातून मुक्त करू शकतात, कायम! ग्रीन एनर्जीवर माझा भर राहणार आहे, कारण आपण मागच्या काळामध्ये ५४ हजार मेगावॅटचे वेगवेगळे प्रोजेक्ट्स हातामध्ये घेतले आहेत. आणि या प्रोजेक्टमुळे २०३० साली, महाराष्ट्रातली ५२ टक्के वीज ही अपारंपरिक स्रोतातली म्हणजे ग्रीन एनर्जी असणार आहे. सगळ्यात जास्त शेतीचं क्षेत्र आणि उद्योगाचं क्षेत्र या दोन्ही क्षेत्रांना प्रचंड फायदा या दोन इनिशिएटीव्हचा असणार आहे. महाराष्ट्रामध्ये रोजगाराची निर्मिती देखील होईल, आणि महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला विशेष चालना यामुळे मिळेल.’’
दरम्यान, मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यावर फडणवीस काल छत्रपती संभाजीनगर इथं खासगी कार्यक्रमासाठी आले होते. विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी तसंच मनपा आयुक्त जी. श्रीकांत, यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं.
Site Admin | December 7, 2024 9:38 AM | नदीजोड प्रकल्प आणि हरित ऊर्जा