येत्या पाच वर्षात वीज बिल कमी करुन सर्व ग्राहकांना दिलासा देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिलं. बीडमध्ये एका कार्यक्रमात ते बोलत होते. ऊर्जा विभागाने पुढच्या पाच वर्षाचे वीजेचे दर काय असतील, याची पिटीशन दाखल केली. त्यामुळे घरगुती आणि औद्योगिक वीजेचे दर कमी होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री सौर कृषी वीज योजनेचं काम मार्च २०२७ पर्यंत पूर्ण होईल, आणि राज्यभरातल्या सर्व शेतकऱ्यांना लागणारा १६ हजार मेगावॅट वीज पुरवठा दिवसा केला जाईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. नदीजोड प्रकल्पाचं काम येत्या वर्षभरामधे सुरू करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
मराठवाड्यातला दुष्काळ इतिहासजमा करता येईल, त्यासाठीचा आराखडा तयार आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. पश्चिमी वाहिन्यांचं समुद्रात वाहून जाणारं पाणी जोर्यंत गोदावरीच्या खोऱ्यात आणलं जाणार नाही तोपर्यंत मराठवाडा दुष्काळमुक्त होऊ शकत नाही, हे पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणलं जाईल, असं मुख्यमंत्री म्हणाले. महायुती सरकारच्या काळात जलयुक्त शिवारच्या माध्यमातून सिंचनाचं काम केलं. त्यामुळे मराठवाड्यातली भूजल पातळी वाढली, असं मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते खो खो विश्वचषक स्पर्धेतल्या विजेत्या संघातले खेळाडू प्रतिक वाईकर, प्रियांका इंगळे, राम कश्यप, सुयश गरगटे, अश्विनी शिंदे, रेश्मा राठोड आणि प्रशिक्षक प्राची वाईकर, शिरीन गोडबोले यांचा सत्कार झाला.