सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरुपी यंत्रणा उभारण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी केली आहे. पणन विभागाच्या १०० दिवसांच्या कामाचा आढावा घेताना ते बोलत होते. समृध्दी महामार्गालगत ऍग्रो हब उभारा, कांदा साठवणुकीसाठी कांदा चाळींची संख्या वाढवा असेही आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.
नवी मुंबईत शेतमालासाठी महा बाजार उभारण्याचं नियोजन आहे. हा बाजार आंतरराष्ट्रीय दर्जाचा असणार असून किमान दोनशे ते अडीचशे एकर जागेत हा प्रकल्प राबवला जाणार असल्याचं अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांनी सांगितले. राज्यातल्या प्रत्येक तालुक्यात एक बाजार समिती, कोकणात माशांसाठी तर आदिवासी भागात स्थानिक उत्पादनासाठी बाजार समिती स्थापन केली जाणार असल्याचं पणन मंत्री जयकुमार रावल म्हणाले. बाजार समित्यांचे उत्पन्नानुसार वर्गीकरण करण्याचेही नियोजन आहे. शालेय शिक्षण विभाग आणि पर्यन विभागांनी १०० दिवसात करायच्या कामांचा आढावाही मुख्यमंत्र्यांनी घेतला.
येत्या १०० दिवसात करायची कामं आणि उपाययोजनांबाबतच्या आराखड्यावर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शालेय शिक्षण विभागाच्या बैठकीत चर्चा झाली. संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विद्यार्थ्यांना संविधानिक मूल्यं शिकविण्यावर भर द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी या दिले. त्यावेळी ते बालत होते. राज्यातल्या शालेय शिक्षकांमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. त्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देऊन चांगलं परिवर्तन घडू शकतं. या बळावर महाराष्ट्र शालेय शिक्षणामध्ये पुन्हा एकदा आघाडीवर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी येत्या १०० दिवसात करायच्या उपाययोजनांचा आराखडा सादर केला. प्रत्येक बाबतीत सकारात्मक विचार घेऊन पुढे जाणार असल्याचे ते म्हणाले.
तर, पर्यटन विभागानं करायच्या कामाचा आढावा घेताना, राज्यात केंद्र आणि राज्य शासनाकडून राबवले जाणारे पर्यटन प्रकल्प गतीनं पूर्ण करण्यावर भर देण्याचे निर्देश त्यांनी दिले. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी राज्यात पर्यटन पोलीस नेमणार असल्याचं फडनवीस यांनी सांगितलं, पर्यटन विभागाच्या १४ सेवा ‘आपले सरकार’ संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी दिले. प्रत्येक जिल्ह्यात मत्स्यालय, धार्मिक स्थळं, विमानतळ विकसित करा. पहिल्या टप्प्यात शिर्डी, पुणे, नागपूर, शेगाव इथं काम सुरू करा, अशा सूचना त्यांनी दिल्या.