कुणाल कामरा विरोधात कठोरात कठोर कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज विधानसभेत दिलं. संविधानाने प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं असलं तरी यातून दुसऱ्याला अपमानित करण्याचा अधिकार कोणालाही नाही. अशा गोष्टी सहन करणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी हा मुद्दा उपस्थित केला आणि कुणाल कामरा याच्या अटकेची मागणी केली. त्याने राज्यातले वातावरण दूषित केले आणि यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असं खोतकर म्हणाले. त्याला मिळणारा निधी, त्याचे सूत्रधार शोधा, त्याचे कॉल रेकॉर्ड तपासा, अशी मागणी त्यांनी केली.
मंत्री शंभूराज देसाई यांनी खोतकर यांच्या मागणीला सहमती दर्शवली. यानंतर सत्ताधारी सदस्यांनी अध्यक्ष समोरच्या जागेत येऊन घोषणाबाजी केली. त्यामुळे अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज ५ मिनिट साठी तहकूब केलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी निवेदन केलं.
कुणाल कामरा यानं जनभावना व्यक्त केली असल्याचं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं.