राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर करण्यासाठीचा रोडमॅप तयार असून हे उद्दिष्ट २०२९ मधेच साध्य होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी व्यक्त केला. सीआयआय यंग इंडियन्सच्या पश्चिम क्षेत्र परिषदेच्या तीन दिवसीय बैठकीचा समारोप आज नाशिकमधे झाला, यात मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. आर्थिक विकासासाठी पायाभूत सुविधा महत्वाच्या आहेत, त्या दृष्टीनं समृद्धी महामार्ग तयार झाला असून शक्तिपीठ महामार्गही तयार केला जात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. देशात सर्वाधिक परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात येत आहे, राज्यात शाश्वत विकासाला प्राधान्य दिलं जात आहे असं फडनवीस म्हणाले.
नाशिकहून वाढवण बंदरापर्यंत ग्रीन फिल्ड रोड तयार केला जाणार असून त्याचा लाभ नाशिकला मिळेल असं त्यांनी सांगितलं. उद्योगासोबतच कृषी क्षेत्राच्या विकासासाठी सरकार प्रयत्नशील आहे, नाशिक हे प्रगत शेतीसाठी ओळखलं जातं, नाशिकनं कृषी क्षेत्रात मूल्यवर्धित साखळी विकसित केली आहे, असं ते म्हणाले.