राज्यात १ लाख १७ हजार २२० कोटी रुपये गुंतवणुकीच्या, उच्च तंत्रज्ञानावर आधारित ४ विशाल प्रकल्पांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मान्यता दिली. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय झाला. या प्रकल्पांमुळे सुमारे २९ हजार रोजगार निर्माण होणार आहेत.
सेमीकंडक्टर निर्मितीचा प्रकल्प पनवेलमध्ये होणार आहे. एकूण ८३ हजार ९४७ कोटी रुपये गुंतवणुकीच्या या प्रकल्पामुळे १५ हजार रोजगार निर्माण होणार आहेत.
पुण्यातल्या इलेक्ट्रीक वाहन निर्मिती प्रकल्पात एकूण १२ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून एक हजार रोजगार निर्माण होतील. छत्रपती संभाजीनगर इथं २१ हजार २७३ कोटी रुपये गुंतवणुकीच्या वाहन प्रकल्पातून १२ हजार रोजगार निर्माण होतील. अमरावती जिल्ह्यात नांदगाव इथं वस्त्रोद्योगात १८८ कोटी एवढी गुंतवणूक आणि ५५० रोजगार निर्मिती होणार आहे.