महाराष्ट्रात नजीकच्या काळात राजकीय पक्षांच्या नेत्यांवर झालेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अशाप्रकारे कुठलाही हिंसाचार होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या स्पष्ट सूचना पोलिसांना दिल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले. निवडणूक काळात कुठलाही हिंसाचार, गैरप्रकार, पैशांची अवैध वाहतूक होणार नाही याकडे लक्ष ठेवण्याच्या स्पष्ट सूचना दिल्याचं ते म्हणाले.
हरयाणात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या बॅटरीच्या पातळीमधे अनियमितता झाल्याच्या २० तक्रारी काँग्रेस उमेदवारांकडून आल्या आहेत. मात्र मतदान यंत्राची तपासणी विविध पातळ्यांवर, उमेदवारी नियुक्त केलेल्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत केली जाते, त्यामुळे त्यात कोणत्याही प्रकारचा फेरफार शक्य नाही, असं राजीव कुमार यांनी सांगितलं.
निवडणूक निकालाबाबत मतदानोत्तर अंदाज जाहीर करताना प्रसारमाध्यमही मोठ्या प्रमाणात वस्तूस्थितीची मोड-तोड केल्याची उदाहरणं त्यांनी दिली. याबाबत माध्यमांनी आत्मपरिक्षण करणं आवश्यक आहे, असं ते म्हणाले.