छत्तीसगड मधे सुरक्षादलांबरोबरच्या चकमकीत आज किमान १० माओवादी ठार झाले. सुकमा जिल्ह्यातल्या कोंटा परिसरात माओवादी अतिरेकी दडून बसले असल्याची खबर मिळाल्यावरुन केंद्रीय राखीव पोलीस दल आणि जिल्हा राखीव सुरक्षा दलानं संयुक्त शोधमोहीम सुरु केली होती. त्या दरम्यान भेज्जी परिसरात झालेल्या गोळीबारात हे अतिरेकी मारले गेले. सुरक्षा दलांनी १० जणांचे मृतदेह शोधले असून त्यांच्याजवळून एके -47 सह मोठ्याप्रमाणात शस्त्रास्त्र आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. सुरक्षादलांची मोहीम अद्याप सुरु आहे.
मार्च २०२६ पर्यंत देशातून कडव्या डाव्या विचारसरणीचा बीमोड करण्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गेल्या ऑगस्ट मधे केली होती. त्यानुसार जानेवारी २०२४ पासून आतापर्यंत केलेल्या विविध मोहिमांमधे २५७ नक्षली अतिरेकी मारले गेले तर ८६१ पकडले गेले. सुमारे ८०० नक्षली शरणागती पत्करुन मुख्य प्रवाहात सामील झाले.