राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळालं नसल्याचा त्यांच्या समर्थकांनी निषेध केला आहे. या संदर्भात आपल्या मतदारसंघात जाऊन, नागरीक, कार्यकर्त्यांशी चर्चा करुन भूमिका जाहीर करणार असल्याचं भुजबळ यांनी म्हटलं आहे. नाराज कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर नाशिक इथं ते वार्ताहरांशी बोलत होते. आपल्याला पक्षानं राज्यसभेवर जाण्याबाबत विचारणा केली होती. मात्र तसं करणं हा आपल्या मतदारसंघातल्या मतदारांचा विश्वासघात ठरेल, असं सांगून त्याला नकार दिल्याचं भुजबळ यांनी सांगितलं.
दरम्यान नाराज भुजबळ समर्थकांनी काल नाशिकमध्ये आंदोलन केलं. कार्यकर्त्यांनी, भुजबळ यांचा मतदारसंघ असलेल्या येवला तालुक्यात विंचूर इथं रास्ता रस्ता रोको केला, तर नाशिकमध्ये राष्ट्रवादी भवनासमोर घोषणाबाजी केली.
ओबीसी समाजाला सरकारमधे प्रतिनिधित्व मिळालं नसल्याचा आरोप करत बीड, माजलगाव इथं आज समता परिषदेतर्फे धरणं आंदोलन करण्यात आलं.