छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा दर्जासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नामांकित केले आहेत, त्यांना लवकरच मंजुरी मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९५ व्या जयंती निमित्ताने पुण्यात आज जय शिवाजी जय भारत पदयात्रेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. शिवरायांची जयंती फक्त भारतातच नाही तर २० देशांमध्ये साजरी केली जाते. त्यांचं प्रशासन, कल्याणकारी धोरणं, संरक्षण आणि नौदलाचं व्यवस्थापन, दूरदर्शी नेतृत्व हे अतुलनीय असल्याचं ते म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी एका मजबूत आणि स्वयंपूर्ण राष्ट्राची कल्पना केली होती, त्याचप्रमाणे आजच्या तरुणांनी नवोन्मेष, सामाजिक सौहार्द आणि समावेशक विकासासाठी काम केलं पाहिजे असं केंद्रीय क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय म्हणाले. राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात ‘जय शिवाजी – जय भारत’ पदयात्रे आयोजित करण्यात आली होती. उच्च पदस्थ अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि युवावर्ग मोठ्या संख्येनं त्यात सहभागी झाले होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य, स्वधर्म आणि स्वभाषा या त्रिसूत्रीवर आधारित शिवसृष्टीचं दालन प्रेरणादायी असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. पुण्यात आंबेगाव इथे शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण करताना ते बोलत होते. या टप्प्याचं काम वेगाने व्हावं यासाठी राज्य शासनाकडून आणखी ५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची घोषणाही फडणवीस यांनी यावेळी केली.
शिवजयंतीच औचित्य साधून राज्यातले शिवकालीन तलाव, बंधारे, गावतळी आणि पाणीपुरवठा करणारे तलाव यामधला गाळ काढण्याच्या मोहिमेचा आज प्रारंभ करण्यात आला. राज्याचे मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते यवतमाळ किटा कापरा इथून या मोहिमेला सुरुवात झाली. याअंतर्गत १ हजार तलावातला गाळ काढण्याचं उद्दिष्ट आहे.