छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ वी जयंतीनिमित्त विविध ठिकाणी भव्य मिरवणुका, शोभायात्रा, व्याख्यानं, चित्र आणि शस्त्र प्रदर्शनं इत्यादी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मिरवणुका आणि पदयात्रांमधे शिवकाळ साकारणाऱ्या वेशभूषा तसंच कसरत करतब दाखवणाऱ्या कवायती लक्ष वेधून घेत आहेत. याविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून..
संसद भवन परिसरातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास विविध मान्यवरांसह शिवप्रेमींकडून अभिवादन करण्यात आलं. नवीदिल्लीत महाराष्ट्र सदनात शिवजयंती सोहळा झाला. भारतीय लष्करानं यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथमच विशेष मानवंदना दिली. साताऱ्यात किल्ले अजिंक्यतारा परिसर काल रात्री हजारो मशालींनी उजळवून टाकण्यात आला होता. शिवजयंतीच औचित्य साधून मालवण-राजकोट इथं उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पायाभरणी पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झालं. जगाला हेवा वाटेल असा छत्रपती शिवरायांचा पुतळा या ठिकाणी उभा राहील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. हा ६० फुटी तलवारधारी पुतळा ब्रॉन्झ धातूचा असेल. पुतळा उभारण्यासाठी आणि आजूबाजूला शिवसृष्टी उभारण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही राणे यांनी दिली.
वाशिम शहरात छत्रपती शिवाजी महाराज व्यायाम प्रसारक मंडळाच्या वतीने शिवकालीन युद्ध कलांचं प्रदर्शन करण्यात आलं. गोंदिया जिल्ह्यात शिवरायांच्या १४ फूट उंच मूर्तीला अभिषेक करण्यात आला. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्य सादर केलं. हिंगोली जिल्ह्यात जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं. धुळे जिल्ह्यात आज शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आलं. सोलापुरात काल चार जणांनी हुतात्मा पुतळ्या समोर सलग १९ तास १९ मिनिटे, १९ सेकंद दांडपट्टा फिरवून शिवरायांना अभिवादन केलं. परभणीत पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आला. पोलिस दलातील सुसज्ज यंत्रणेतील वाहने, शस्त्र, पोलिस अधिकारी, कर्मचारी यात सहभागी झाले होते.