पायी पालखी सोहळ्याबरोबर येणाऱ्या वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी पालखीमार्गावरची सगळी कामं वेळेत पूर्ण करण्यासाठी जास्तीचे कामगार लावावेत, अशा सूचना सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या. आषाढी वारी पूर्व नियोजनाबाबत सोलापुरातल्या नियोजन भवन इथल्या बैठकीत ते बोलत होते.
आषाढी वारी पालखी सोहळ्यात पालखी मार्ग, पालखी तळ, विसावा, रिंगण सोहळा या ठिकाणी पाणी, आरोग्य, स्वच्छतेच्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, यासाठी योग्य दक्षता घेऊन प्रत्येक विभागांनं नियोजन करावं. यंदा मंदिर आणि शहरातल्या प्रमुख रस्त्याच्या झाडावर तसंच वाळवंटात विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. गर्दी व्यवस्थापन आणि शोध तसंच बचावासाठी तीन ड्रोनचा वापर करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले.