एन टी ए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या परीक्षा पारदर्शी, सहज आणि योग्य वातावरणात पार पडाव्यात यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं उच्चस्तरीय तज्ञ समितीची स्थापना केली आहे. इस्रोचे माजी अध्यक्ष डॉक्टर के राधाकृष्णन या सात सदस्यीय समितीचे अध्यक्ष असतील. कार्यक्षमता वाढवून एन टी ए च्या चुकीच्या पद्धती मोडून काढत परीक्षा प्रक्रियेत सुधारणा, संकलित माहिती सुरक्षा तसंच संस्थेची रचना आणि कामकाज याची समीक्षा समिती करणार आहे. एन टी ए च्या कामकाजाचं मूल्यांकनही समिती करणार आहे. आपला अहवाल सादर करण्यासाठी समितीला दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांचं हित आणि त्यांचं उज्ज्वल भवितव्य याला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी समितीच्या स्थापनेनंतर म्हटलं आहे.