केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया उपक्रमाला आज १० वर्ष पूर्ण झाली. याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांचं कौतुक केलं आहे. देशातल्या १४० कोटी नागरिकांचा एकत्र निर्धार यातून दिसून येतो. यामुळं विविध क्षेत्रातली निर्यात वाढली, उत्पादन क्षमतेचा विकास झाला आणि अर्थव्यवस्था मजबूत झाल्याचं प्रधानमंत्री म्हणाले. सुधारणांच्या मार्गावर देशाची प्रगती सुरू राहील आणि एकत्रितरित्या आपण आत्मनिर्भर आणि विकसित भारत बनवू असं त्यांनी सांगितलं.
गुंतवणूक वाढवणं, संशोधनाला चालना देणं, जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारणं आणि उत्पादन, आरेखन आणि नवोन्मेष या क्षेत्रात देशाला आघाडीचं स्थान मिळावं यासाठी सरकारनं हा उपक्रम सुरू केला होता. आता मोबाइल निर्यातीत भारत जगात दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. उत्पादन आधारित सवलत योजनेमुळं विविध क्षेत्रात सव्वा लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक आली आहे. गेल्या दशकभरात तासाला एक या वेगानं स्टार्टअप देशात सुरू झाले आणि १५ लाख नागरिकांना रोजगार मिळाला. कोरोना लस उत्पादनातही भारतानं आघाडीच स्थान घेतलं आणि जगातल्या एकूण लशींपैकी निम्म्या भारतानं पुरवल्या.