केंद्र सरकारनं महाराष्ट्रात रेल्वेसाठी विक्रमी १५ हजार ९४० कोटी रुपयांची तरतूद केली असून ही रक्कम विशेष पॅकेजइतकीच आहे, असं प्रतिपादन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केलं आहे. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांसाठी रेल्वे क्षेत्रात केलेल्या तरतुदींबद्दल ते आज दूरस्थ पद्धतीनं आयोजित वार्ताहर परिषदेत बोलत होते.
महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सरकार आल्यानंतर रेल्वे प्रकल्पांचं काम वेगानं झालं, असं सांगून, अशा प्रकल्पांसाठी राज्य सरकारची मदत महत्त्वाची असते, असं ते म्हणाले. राज्यात आत्तापर्यंत नवे रेल्वेमार्ग, मार्गाचं दुपदरीकरण, त्रिपदरीकरण इत्यादी कामांसाठी ८ हजार ५८१ रुपयांची, तर गतिशक्ती, मल्टिमोडल टर्मिनल, रेल्वेस्थानकं अशा कामांसाठी १ लाख ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. तसंच दरवर्षी राज्यात १८० किलोमीटरचे नवे रेल्वेमार्ग तयार होत आहेत, असं त्यांनी सांगितलं. राज्यातल्या सर्व स्थानकांचं १०० टक्के विद्युतीकरण पूर्ण झालं आहे, अमृत स्थानक योजनेअंतर्गत राज्यातल्या १२८ रेल्वेस्थानकांचं पूर्ण नूतनीकरण केलं जात आहे, गेल्या १० वर्षांमध्ये राज्यात २९२ उड्डाणपूल, भुयारी मार्गांचं काम पूर्ण झालं आहे, अशी माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली.