कोलकात्याच्या महिला डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग संशयित आरोपी संजय रॉय याची मानसशास्त्रीय चाचणी आज घेणार आहे. दिल्लीच्या केंद्रीय न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेच्या विश्लेषकांचं एक पथक कोलकात्याला पोहोचलं असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, केंद्रीय अन्वेषण विभागानं काल सलग दुसऱ्या दिवशी आर. जी. कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे माजी मुख्याध्यापक डॉ. सुदीप घोष यांची प्रदीर्घ चौकशी केली.
आरोग्य सुविधा क्षेत्रात काम करणाऱ्यांच्या सुरक्षितेसाठी आवश्यक त्या उपाययोजना सुचवण्याच्या दृष्टीनं एक समिती स्थापन करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. यासंदर्भात राज्य सरकारांनीही समितीला आपापल्या सूचना द्याव्यात, असं सरकारनं म्हटलं आहे.
दरम्यान, कोलकाता पोलिसांनी आर. जी. कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या आवारात आजपासून सात दिवस भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १६३ अंतर्गत जमावबंदी लागू केली आहे.