नीट यूजी पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने केेलेल्या तक्रारीनंतर सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण संस्थेने गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी देशभरात दाखल झालेल्या गुन्ह्यांचा तपास हाती घेण्यासाठी सीबीआय पावलं उचलत आहे. नीट यूजी परीक्षेतल्या अनियमिततेचं प्रकरण काल केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने सीबीआयकडे सोपवलं होतं. परीक्षेचं पावित्र्य अबाधित राखण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे. तसंच या प्रकरणात दोषी असणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाईल, असं शिक्षण मंत्रालयाने सांगितलं.
दरम्यान, याच प्रकरणात दहशतवादविरोधी पथक – एटीएसच्या नांदेड शाखेने दोन शिक्षकांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं असून, त्यांचा या पेपरफुटी प्रकरणी काही संबंध आहे का, याचा तपास केला जात असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.