NEET परीक्षेतील कथित गैरप्रकारांची चौकशी करण्यासाठी केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयचं एक पथक गुजरातमधल्या गोध्रा इथं दाखल झालं आहे. गोध्रा इथल्या एका परीक्षा केंद्रावर ५ मे रोजी NEET चा पेपर झाल्यानंतर तीन दिवसांनी तिथल्या पोलीस स्टेशनमध्ये परीक्षेतल्या गैरप्रकाराबद्दल एफआयआर नोंदवण्यात आला होता. गोध्रा पोलिसांनी या प्रकरणात ३० विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका सोडवण्यास मदत केल्याच्या आरोपाखाली आतापर्यंत पाच आरोपींना अटक केली आहे.
दरम्यान, गुजरातमधल्या पंचमहाल जिल्हा न्यायालयाच्या सत्र न्यायाधीशांनी शुक्रवारी आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला.
तसेच, नीट पेपरफुटीप्रकरणी लातूरमधून चार जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यातल्या जलील पठाण याला पोलिसांनी काल अटक केली होती. त्याला आज न्यायालयानं त्याला २ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.