कॅनडामध्ये येत्या २८ एप्रिल रोजी निवडणुका होणार असल्याची घोषणा प्रधानमंत्री मार्क कार्नी यांनी केली आहे. यासाठी त्यांनी रविवारी गर्व्हनर जनरल मेरी सायमन यांची भेट घेऊन संसद विसर्जित करण्याची विनंती केली होती. ती सायमन यांनी मान्य केली आहे. त्यामुळं या आगामी निवडणुकांमध्ये कार्नी यांचा सामना कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते पियरे पॉइलीव्हरे यांच्याशी होणार आहे.
सध्या अमेरिकेसोबत सुरू असलेलं व्यापार युद्ध आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प कॅनडाला अमेरिकेचे ५१ वं राज्य बनवण्यासाठी देत असलेल्या धमक्यांमुळं देशातील वातावरण गढूळ झालं आहे. त्यामुळं देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी आपण जनादेश मागत असल्याची भूमिका कार्नी यांनी जाहीर केली आहे. तसंच ट्रम्प सतत कॅनडावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत तो आम्ही यशस्वी होऊ देणार नसल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.