विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांनी काल प्रचाराचा नारळ फोडला. तर वंचित बहुजन आघाडीनं काल जाहीरनामा प्रसिद्ध केला. महायुतीतर्फे शिवसेनेचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी कोल्हापूरमध्ये एकत्रित जाहीर सभा घेत प्रचाराचं रणशिंग फुंकलं.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही काल राज्यात ठीकठिकाणी जाहीर सभा घेऊन प्रचाराचा प्रारंभ केला. यापुढे आपण कोणतीही निवडणूक लढणार नाही, असं राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल बारामती तालुक्यात बोलताना सांगितलं. कॉंग्रेसतर्फे प्रचाराचा प्रारंभ आज कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे आणि नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत होणार आहे.
नागपुरात ‘संविधान सन्मान संमेलन’ आणि संध्याकाळी मुंबईत ‘महाराष्ट्र स्वाभिमान सभा’ घेण्यात येणार आहे. काल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापुरातून प्रचाराला सुरुवात केली. झारखंडमध्ये काल संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी लोहारडागा इथं झालेल्या सभेत झारखंडला विकसित राज्य बनवण्याचा भाजपाचा संकल्प असल्याचं सांगितलं. तर कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी हजारीबाग इथल्या सभेत भाजप धर्म आणि जातीच्या आधारावर दुफळी माजवत असल्याचा आरोप केला.