राज्यात विधानसभा प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. सर्वच पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांच्या झंजावाती प्रचार दौऱ्यामुळे राज्यातलं वातावरण ढवळून निघालं आहे. त्याचवेळी ठिकठिकाणचे उमेदवार आणि कार्यकर्ते कोपरा सभा, मेळावे, प्रचार फेऱ्या आणि घरोघरी मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घेत आहेत. कालही विविध पक्षांच्या राष्ट्रीय नेत्यांच्या राज्यात प्रचार सभा झाल्या.
प्रचार
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. सर्वच पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांच्या झंजावाती प्रचार दौऱ्यामुळे राज्यातलं वातावरण ढवळून निघालं आहे. प्रधानमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी काल राज्यात तीन ठिकाणी प्रचार सभा घेतल्या. काँग्रेस आणि महाविकास आघाडी सत्तेत आली तर आरक्षण हटवेल, असा आरोप मोदी यांनी काल मुंबईत शिवाजी पार्कवर घेतलेल्या सभेत केला.
शिवसेनेचे मुख्य नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले, यांच्यासह महायुतीचे इतर नेते यावेळी उपस्थित होते.
भाजप नेते, आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही काल धाराशिव जिल्ह्यात नळदुर्ग इथं, सांगली जिल्ह्यात पलूस कडेगाव आणि कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी इथं महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेतली.
विकसित महाराष्ट्रासाठी महायुती सरकार राज्यात पुन्हा आलं पाहिजे, असं प्रतिपादन गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत केलं. यावेळी त्यांनी केंद्र सरकार आणि राज्यातील महायुती सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली; आणि विरोधकांवर जोरदार टीकाही केली.
कॉँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनीही राज्यात प्रचार सभा घेतल्या. महाराष्ट्रात सत्तेत आल्यास शेतकऱ्यांचं तीन लाखापर्यंतचे कर्ज माफ केलं जाईल,” अशी घोषणा राहुल गांधी यांनी केली. नांदेड आणि नंदुरबार इथं महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत ते बोलत होते.
सत्ताधारी विकासाचे मुद्दे न देता केवळ काँग्रेस आणि गांधी घराण्यावर टीका करत आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारच्या हातात राज्य दिल्यास आम्ही विकासाला गती देऊ, असं आश्वासन मल्लिकार्जुन खरगे यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत दिलं.
खर्गे यांनी काल इगतपुरी इथंही प्रचार सभा घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीनं महाराष्ट्राच्या लोकांना खोटी आश्वासनं दिल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल नागपुरात प्रसार माध्यमांशी संवाद साधला, आणि महायुतीच्या सरकारवर टीका केली.
राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी चिंचवड विधानसभा मतदार संघातील सांगवी इथं प्रचार फेरी घेतली. तर पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काल नवी मुंबईत प्रचार सभा घेतळी.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल छत्रपती संभाजीनगर इथं तसंच अहिल्यानगर जिल्ह्यात श्रीगोंदा आणि नेवासे इथं जाहीर सभा घेतल्या. तर पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी काल दापोली इथं सभा घेतली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातल्या खडकवासला मतदारसंघात काल सभा घेतली.