विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांनी काल प्रचाराचा नारळ फोडला. तर वंचित बहुजन आघाडीनं काल जाहीरनामा प्रसिद्ध केला.
महायुतीतर्फे शिवसेनेचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी कोल्हापूरमध्ये एकत्रित जाहीर सभा घेत प्रचाराचं रणशिंग फुंकलं. राज्यात महिला, शेतकरी, युवा यांच्यासह विविध घटकांसाठी राबवलेल्या कल्याणकारी योजनांचा लेखाजोखा यावेळी तीनही नेत्यांनी मांडला. त्याचवेळी विरोधकांवर जोरदार टीकाही केली.
तत्पूर्वी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर आणि साताऱ्यातील विविध मतदारसंघात जाहीर सभा घेतली. महायुती सरकारनं सुरू केलेली एकही योजना आम्ही बंद करणार नाही, असं शिंदे म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांची काल नागपूर दक्षिण आणि पश्चिम मतदारसंघात प्रचार फेरी झाली. माझ्या लाडक्या बहिणी मला नक्कीच मतदान करतील असा विश्वास व्यक्त करत फडणवीस यांनी यावेळी काँग्रेसवर जोरदार टीका केली.
महायुतीच्या जागावाटपानंतरही अपक्ष म्हणून काही उमेदवार उभे राहिले असून त्याबाबत परस्पर सामंजस्याने तोडगा काढू असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केला.
भाजपच्या माजी खासदार हिना गावित यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. गावित यांनी अक्कलकुवा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. हा मतदारसंघ, जागा वाटपात शिवसेनेला मिळाला आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही काल राज्यात ठीकठिकाणी जाहीर सभा घेऊन प्रचाराचा प्रारंभ केला. यापुढे आपण कोणतीही निवडणूक लढणार नाही, असं राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल बारामती तालुक्यात बोलताना सांगितलं. महाराष्ट्रात नव्या नेतृत्वाची फळी उभी करण्याचा संकल्प आम्ही केला आहे; असं ते म्हणाले. महाविकास आघाडीचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.
कॉंग्रेसतर्फे प्रचाराचा प्रारंभ आज कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे आणि नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत होणार आहे. नागपुरात ‘संविधान सन्मान संमेलन’ आणि संध्याकाळी मुंबईत ‘महाराष्ट्र स्वाभिमान सभा’ घेण्यात येणार आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे हे देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत.
तत्पूर्वी काल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापुरातून प्रचाराला सुरुवात केली. राधानगरी इथं जाहीर सभा घेत त्यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला. आताची लढाई ही महाराष्ट्र प्रेमी आणि महाराष्ट्र द्रोही यांच्यातली लढाई आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. ठाकरे यांनी काल रत्नागिरी शहरातही प्रचार सभा घेतली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी काल यवतमाळ जिल्ह्यात राळेगाव मतदार संघात प्रचार सभा घेतली. गेली अनेक वर्ष या भागात आपण येत आहोत; मात्र इथले प्रश्न अजूनही तेच आहेत; असं राज ठाकरे म्हणाले. आत्महत्या करणाऱ्यांच्या घरच्या परिस्थितीचा विचारही करवत नाही. पण ही परिस्थिती ज्यांच्यामुळे येते अशा लोकांना शिक्षा देणार आहात का नाही? असा सवाल उपस्थित करत मनसेच्या उमेदवारांना मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केलं.
एम आय एम पक्षाचे नेते खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी धुळ्यात जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी भाजपा आणि महायुती सरकारवर टीका केली.