विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामुळे ऐन थंडीच्या दिवसांत राज्यातलं राजकीय वातावरण तापलं आहे. विविध राजकीय पक्षांच्या केंद्रिय नेत्यांच्या प्रचारसभा राज्यात होत आहेत. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांचा मारा सुरू आहे. अन्य काही राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्रीदेखील आपापल्या पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी मैदानात उतरले आहेत.
भाजपा नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल पुण्यात प्रचारसभा झाली. या सभेत त्यांनी केंद्रातल्या आणि राज्यातल्या सरकारच्या लोककल्याणकारी योजनांचा लेखाजोखा मांडला. काँग्रेसनं कलम ३७०द्वारे जम्मू-काश्मीर आणि राज्यघटना यांच्यात भिंत निर्माण केली आणि त्यामुळे खोऱ्यात दहशतवादाला पाठिंबा मिळाला असा आरोप त्यांनी केला. संपूर्ण देशात संविधानाची अंमलबजावणी का झाली नाही, याचं उत्तर कॉंग्रेसनं जनतेला द्यावं असं ते म्हणाले.
राज्यातल्या महायुती सरकारने महाराष्ट्राच्या विकासाची गती अभूतपूर्व ठेवली आहे. देशात मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणूक झाली असून त्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे. महायुती हाच राज्याच्या विकासाचा पर्याय आहे, असंही मोदी म्हणाले, आपल्या भाषणात बोलताना ते पुढ म्हणाले —
महाविकास आघाडी ही दिशा आणि धोरण नसलेली गाडी असल्याची टीका मोदी यांनी सोलापूर इथल्या प्रचारसभेत केली. देशातल्या आरक्षणाला काँग्रेसकडूनच धोका असल्याचं ते म्हणाले. भाजपाच्या अनेक लोकोपयोगी योजनांचा सर्वसामान्य लोकांना लाभ झाला असं सांगून इथेनॉलबाबतच्या धोरणामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आतापर्यंत ८० हजार कोटी रुपयांचा लाभ झाल्याची माहिती त्यांनी दिली.
भाजपाचा जाहीरनामा हे विकासाचं हमीपत्र आहे, गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्राच्या विकासकामांचा वेग वाढला आहे असं मोदी चिमूर इथल्या प्रचारसभेत म्हणाले.
भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही काल मुंबईत दोन प्रचारसभा घेत विरोधकांवर हल्लाबोल केला. या निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा सुपडा साफ होणार असल्याचा दावा शहा यांनी केला.
मुंबई ठाण्यासह संपूर्ण कोकणात महायुतीला ६० पेक्षा जास्त जागा मिळतील असा विश्वास भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली इथं व्यक्त केला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वाशीम जिल्ह्यात रिसोड इथं प्रचारसभा झाली. राज्य सरकारनं गेल्या अडीच वर्षांमध्ये महिलांना आणि शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी विविध योजना राबवल्या असं शिंदे म्हणाले. महायुतीने सुरू केलेल्या योजना बंद पाडण्याचा प्रयत्न महाविकासआघाडीनं केल्याची टीका त्यांनी केली.
पालघर जिल्ह्याला महायुती सरकारनं नावारुपाला आणलं असं सांगून वाढवण बंदर हे आशिया खंडातलं सर्वात मोठं बंदर या जिल्ह्यात आम्ही आणलं असं भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. या बंदराच्या माध्यमातून 10 लाख रोजगार निर्मिती होईल असं त्यांनी पालघर जिल्ह्यात डहाणू इथं आयोजित प्रचारसभेत सांगितलं.
तर पेण इथल्या प्रचारसभेत फडणवीस यांनी शेतकऱ्यांना मोफत वीज, कर्जमाफी देण्याचं आश्वासन दिलं.
महाराष्ट्रानं अनेक महापुरुष या देशाला दिले. या महापुरुषांनी आपल्या नेतृत्वाने देशाला प्रेरणा दिली असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अकोला इथल्या प्रचारसभेत सांगितल . भाजपाच्या कार्यकाळात नवनवीन योजना अमलात येत असून देश प्रगतीपथावर वाटचाल करत आहे असं योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं.
पुंण्याचं बीज पेरलं तर आशीर्वादाचंच पीक उगवतं असं म्हणत केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची माहिती भाजपा नेत्या स्मृती इराणी यांनी धुळे जिल्ह्यात शिरपूर इथल्या प्रचारसभेत दिली.