कॅम्लिन उद्योग समूहाचे संस्थापक,माजी अध्यक्ष सुभाष दांडेकर यांचं काल मुंबईत निधन झालं,ते ८५ वर्षांचे होते. शालेय विद्यार्थ्यांना लागणारी गणितीय उपकरणं, पेन्सिल, मार्कर, शाई यांसह चित्रकार आणि अन्य कलाकारांना लागणारं सर्व प्रकारचं साहित्य, कार्यालयीन उत्पादनं आणि व्यावसायिक उत्पादनांची निर्मिती कॅम्लिन या कंपनीकडून गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. या कंपनीची गेली अनेक वर्षे धुरा वाहताना दांडेकर यांनी उत्पादनांची गुणवत्ता आणि मूल्यांशी कधीच तडजोड केली नाही.
कला आणि उद्योग क्षेत्रातील अनेकांसाठी ते मार्गदर्शक होते.अनेक सामाजिक – स्वयंसेवी संस्थांना आणि उपक्रमांना पाठबळ देण्याचं काम त्यांनी केलं.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दांडेकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.