सिंधु संस्कृतीतलं प्राचीन बंदर लोथल इथे राष्ट्रीय सागरी वारसा संकुल विकसित करायला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला. माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बातमीदारांना ही माहिती दिली. भारताच्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण सागरी वारशाला जतन करण्याचा या प्रस्तावाचा उद्देश आहे. या संकुलात लाईट हाऊस संग्रहालयाचा समावेश असेल, असं त्यांनी सांगितलं.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना आणि इतर कल्याणकारी योजनांअंतर्गत पौष्टिक तांदळाचा मोफत पुरवठा २०२८ पर्यंत कायम ठेवायलाही केंद्र सरकारनं मंजुरी दिली. ॲनिमिया अर्थात रक्तक्षय आणि सूक्ष्म पोषक तत्वांची कमतरता कमी करण्यासाठी हे पाऊल उचललं असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. यासाठी १७ हजार ८२ कोटी रुपये खर्च येणार असून, हा संपूर्ण निधी केंद्र सरकार देणार आहे, असं त्यांनी सांगितलं.
यासोबत राजस्थान आणि पंजाबच्या सीमावर्ती भागात २ हजार २८० किलोमीटर लांबीच्या रस्ते बांधणीला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी ४ हजार ४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च येणार आहे.