रेल्वे मंत्रालयाच्या सुमारे १८ हजार ६५८ कोटी रुपये खर्चाच्या ४ प्रकल्पांना आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. महाराष्ट्र, ओदिशा आणि छत्तीसगढ या तीन राज्यातल्या मिळून १५ जिल्ह्यांमधून बाराशे सत्तेचाळीस किलोमीटर लांबीचे हे रेल्वे मार्ग जाणार आहेत. महाराष्ट्रातल्या गोंदिया – बल्लारशाह रेवेमार्गाचं दुपदरीकरण, तसंच गडचिरोली आणि मध्यप्रदेशातल्या राजनंदगाव या आकांक्षित जिल्ह्यांमधे मिळून १९ नवीन रेल्वे स्थानकांची उभारणी या कामांचा या प्रकल्पांमधे समावेश आहे. या प्रकल्पांमुळे इंधन तेलावरचा खर्च वाचणार असून कार्बन विसर्जनाचं प्रमाणही कमी होईल. तसंच यातून ३७९ लाख दिवस रोजगार मिळेल असंही वैष्णव म्हणाले.
पूर्णपणे केंद्रपुरस्कृत व्हायब्रंट व्हिलेजेस कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यालाही केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली. सरहद्दीजवळच्या दुर्गम भागतल्या खेड्यांमधे राहणाऱ्यांचं जीवनमान सुधारण्यासाठी हा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. या कामाकरता ६ हजार ८३९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या कार्यक्रमामुळे या दुर्गम भागातल्या सांस्कृतिक वारशाचं जतन होऊन पर्यटनाला चालना मिळेल असं अश्विनी वैष्णव म्हणाले.