बांगलादेश मधल्या सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्रसरकारने आज नवी दिल्ली इथं सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती. परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी आज या मुद्द्यावर सर्व नेत्यांना माहिती दिली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री तसंच भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, तृणमूल काँग्रेसचे नेते सुदीप बंदोपाध्याय, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे, यांच्यासह इतर नेते या बैठकीला उपस्थित होते.
दरम्यान, बांगलादेशची संसद बरखास्त करून हंगामी सरकार स्थापन केलं जाईल, असं बांगलादेशचे राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी म्हटलं आहे. ढाका इथल्या बंगभवन इथं तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांच्या उपस्थितीत विविध राजकीय पक्षांचे नेते आणि प्रतिनिधींसमवेत झालेल्या बैठकीत काल त्यांनी ही माहिती दिली.