याशिवाय, विविध राज्यांतल्या विधानसभांच्या एकंदर ४८ पोटनिवडणुकांचे निकाल आज स्पष्ट झाले. आसाममधल्या पाचपैकी तीन जागांवर भाजपानं, तर युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल आणि आसोम गण परिषद या पक्षांनी प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला आहे. बिहारमधल्या चारपैकी दोन जागी भाजपानं, तर प्रत्येकी एका जागेवर हिंदुस्तानी आवाम मोर्चा सेक्युलर आणि संयुक्त जनता दलानं बाजी मारली आहे. छत्तीसगड आणि गुजरातमधल्या प्रत्येकी एका जागेवर भाजपाची सरशी झाली आहे. कर्नाटकातल्या तिन्ही जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. केरळमध्ये दोनपैकी प्रत्येकी एक जागा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि काँग्रेसनं जिंकली आहे. मध्य प्रदेशातल्या एका जागेवर भाजपा आणि एका जागेवर काँग्रेस विजयी झाली आहे. मेघालयमधली एक जागा नॅशनल पीपल्स पार्टीनं आपल्या नावावर केली आहे.
पंजाबमधल्या तीन जागांवर आम आदमी पक्षानं तीन, तर काँग्रेसनं एका जागेवर विजय मिळवा आहे. राजस्थानातल्या सातपैकी पाच जागांवर भाजपाची सरशी झाली आहे, तर प्रत्येकी एका जागेवर काँग्रेस आणि भारत आदिवासी पक्षाचा विजय झाला आहे. सिक्किममधल्या दोन्ही जागांवर सिक्किम क्रांतिकारी मोर्चानं विजय मिळवला आहे. उत्तर प्रदेशातल्या सहा जागांवर भाजपा, दोन जागांवर समाजवादी पक्ष, तर एका ठिकाणी राष्ट्रीय लोक दलाचा उमेदवार निवडून आला आहे. उत्तराखंडमधली एक जागा भाजपानं आपल्या नावावर केली आहे. तर पश्चिम बंगालमधल्या सहापैकी सहा जागा तृणमूल काँग्रेसनं जिंकल्या आहेत.