संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन २२ जुलैपासून सुरू होणार असल्याची माहिती संसदीय कार्यमंत्री किरेन रीजिजू यांनी समाज माध्यमावरल्या पोस्टद्वारे दिली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन २३ जुलैला लोकसभेत २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करतील. १२ ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन सुरू राहणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतरचा हा पहिलाच अर्थसंकल्प असेल. हा अर्थसंकल्प सरकारची दूरगामी धोरणं आणि भविष्यवेधी दृष्टिकोनाचा प्रभावी दस्तऐवज असेल असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गेल्या महिन्यांत संसदेच्या दोन्ही
सभागृहांच्या संयुक्त बैठकीतल्या अभिभाषणात म्हटलं होतं. लोकसभा निवडणुकांमुळे यावर्षी फेब्रुवारीमध्ये अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता.