संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र आजपासून सुरू झालं. पीएम श्री योजनेच्या अंमलबजावणीबाबत तमिळनाडू सरकारवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलेल्या टिप्पणीच्या निषेधात द्रमुक सदस्यांनी गदारोळ केला. केंद्रीय शिक्षण मंडळाच्या शाळांमधे पीएम श्री योजना लागू करण्याला तमिळनाडू सरकारने आधी संमती दिली मात्र आता घूमजाव करुन राज्यसरकार विद्यार्थ्यांचं नुकसान करीत आहे, अशी टीका प्रधान यांनी केली होती. त्याच्या निषेधात झालेल्या घोषणाबाजीमुळे सभागृहाचं कामकाज अर्धा तास तहकूब करण्यात आलं. मतदार याद्यांमधे घोटाळे झाल्याचा आरोप करत त्याविषयी चर्चेची मागणी आज विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी केली.
अधिवेशनाच्या या सत्रात गदारोळाच्या पार्श्वभूमीवर सभापती ओम बिरला यांनी कामकाज सल्लागार समितीची बैठक बोलावली होती. प्रश्नोत्तर काळ सुरळीत चालावा या करता सहकार्य करण्याचं आवाहन, सभापतींनी सदस्यांना केलं. अधिवेशनाचं हे सत्र ४ एप्रिल पर्यंत चालणार असून त्यात २० बैठका होतील. रेल्वे, कृषी आणि जलशक्ती मंत्रालयाच्या मागण्यांवर प्रामुख्याने चर्चा होणार आहे. मणिपूरमधे राष्ट्रपती राजवट, मणिपूरचा अर्थसंकल्प, वक्फ सुधारणा विधेयक इत्यादी विधेयकं मंजुरीसाठी मांडली जाणार आहेत.
मतदारांना एकापेक्षा अधिक ओळखपत्र जारी होणं, अमेरिकेकडून आर्थिक मदत, मतदानाच्या प्रमाणाविषयीचे मुद्दे, इत्यादी विविध मुद्यांवर राज्यसभेत विरोधी पक्ष सदस्यांनी दिलेले स्थगन प्रस्ताव उपाध्यक्षांनी फेटाळल्यामुळे नाराज झालेल्या सदस्यांनी सभात्याग केला. सरकार कोणत्याही मुद्द्यावर नियमांनुसार चर्चेला तयार असल्याचं, केंद्रीय मंत्री जे. पी नड्डा यांनी सांगितलं. मात्र विरोधकांचं त्यानं समाधान झालं नाही. विरोधकांचा सभात्याग हा संविधानाची पायमल्ली असल्याची, टीका नड्डा यांनी केली.