यंदाच्या अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या कर सवलतीं हेच प्रमुख वैशिष्ट्य असल्याची प्रतिक्रीया उद्योग जगताने व्यक्त केली आहे. १२ लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न पूर्णपणे करमुक्त करणं हाच यंदाच्या अर्थसंकल्पातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा असल्याचं मत उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांनी मांडलं आहे. यामुळे मध्यमवर्गीयांच्या हातात अधिक पैसे येतील, ज्यामुळे वस्तू, दुचाकी आणि प्रवास या क्षेत्राला चालना मिळेल, असं बिर्ला यांनी सांगितलं.
तर, मूलभूत कार्यांसाठी पैसा देणं आणि आर्थिक क्षेत्रात सावधगिरी बाळगायचा प्रयत्न करणं यातला सरकारचा संघर्ष या अर्थसंकल्पात दिसून येत असल्याचं निरीक्षण आर्थिक आयोगाचे माजी सल्लागार रथिन रॉय यांनी नोंदवलं आहे.
पर्यटन, चामडे आणि पादत्राणे उद्योग तसंच सागरी क्षेत्राला या अर्थसंकल्पात दिलेलं प्रोत्साहन रोजगारनिर्मितीसाठी फार महत्वाचं ठरेल असं फिक्की चे अध्यक्ष हर्षवर्धन अगरवाल यांनी म्हटलं आहे. करसवलतीची कक्षा ७ लाखांपासून १२ लाखापर्यंत वाढवणे तसेच भांडवली खर्च कायम ठेवणे ही या अर्थसंकल्पाची मोठी वैशिष्ट्ये असल्याचं ते म्हणाले.