पुढच्या आठवड्यात नवीन आयकर विधेयक आणण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी आज केली. टॅक्स रिबेटच्या सोयीमुळं १२ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्यांना नवीन कर रचनेनुसार कुठलाही आयकर द्यावा लागणार नाही, अशी मध्यमवर्गासाठी खूषखबर त्यांनी आजच्या भाषणात दिली. नोकरदारांना ७५ हजार रुपयांचं standard deduction मिळत असल्यानं त्यांना पावणे १३ लाख रुपयांच्या उत्पन्नावर काहीही आयकर द्यावा लागणार नाही.
नवीन कर रचनेत असलेल्या करांच्या दरांमध्येही सुधारणा त्यांनी आज जाहीर केल्या. त्यानुसार आता ४ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्यांना कुठलाही कर द्यावा लागणार नाही, यापूर्वी ही मर्यादा ३ लाख रुपये होती. त्यापुढील उत्पन्नावर असलेल्या करांच्या दरांमध्येही त्यांनी मोठी सवलत दिली आहे. त्यामुळे नवीन कर रचना मोठ्या प्रमाणात आकर्षक झाली आहे. पूर्वी नवीन कर रचनेत १५ लाखांच्या वर असलेल्या उत्पन्नावर ३० टक्के दराने कर द्यावा लागत होता आणि २४ लाखाच्या वर असलेल्या उत्पन्नावर ३० टक्के दराने कर द्यावा लागेल. नवीन कर रचनेअंतर्गत
४ ते ८ लाख रुपयांदरम्यानच्या उत्पन्नासाठी ५ टक्के,
८ ते १२ लाख रुपयांदरम्यानच्या उत्पन्नासाठी १० टक्के दराने आयकर द्यावा लागेल.
१२ ते १६ लाख रुपयांच्या दरम्यान असलेल्या उत्पन्नासाठी १५ टक्के,
१६ ते २० लाखांसाठी २० टक्के आणि २० ते २४ लाखासाठी २५ टक्के दराने आयकर द्यावा लागेल.
यामुळं १२ लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्यांचा ८० हजार रुपये आयकर वाचेल. १८ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांचा ७० हजार आणि २५ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांचा १ लाख १० हजार रुपये आयकर वाचेल. याशिवाय TDS आणि TCS साठीही त्यांनी अनेक सुधारणा जाहीर केल्या. सुधारित आयकर विवरण पत्र भरण्याची मुदत आता २ वर्षांवरुन ४ वर्ष केली आहे. याशिवाय क्रिप्टो चलनाच्या माध्यमातून असलेली मालमत्ताही जाहीर करावी लागणार आहे.