ईव्हीएम अर्थात, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा प्रश्न मिटेपर्यंत बहुजन समाज पार्टी कोणत्याही पोटनिवडणुकीत भाग घेणार नाही, असं पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी आज जाहीर केलं. त्या लखनौ इथं पक्षाच्या बैठकीनंतर बातमीदारांशी बोलत होत्या. उत्तरप्रदेशात नुकत्याच झालेल्या ९ विधानसभा मतदारसंघामधल्या पोटनिवडणुकीची प्रक्रिया आणि निकालांबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे.
मतपत्रिकांद्वारे मतदान होत होतं त्यावेळी बनावट मतदारांचा उपयोग केला जायचा, आता ईव्हीएमचा वापर करुन तसाच प्रकार केला जात आहे, असा आरोप त्यांनी केला. लोकशाहीसाठी ही दुःखाची आणि चिंतेची बाब आहे. त्यामुळे बोगस मतदान रोखण्यासाठी निवडणुका आयोग कठोर उपाययोजना करत नाही, तोपर्यंत आपला पक्ष कोणत्याही पोटनिवडणुका लढवणार नाही, असं मायावती म्हणाल्या.