अमेरिकेसोबतचे संबंध दृढ करण्यासाठी बंगळुरूमधल्या नवीन अमेरिकी वाणिज्य दूतावासामुळे चालना मिळेल, असं मत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी व्यक्त केलं आहे. ते आज बेंगळुरूमध्ये अमेरिकेच्या नवीन वाणिज्य दूतावासाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. जयशंकर म्हणाले की दोन्ही देशांमध्ये कृत्रिम बुद्धीमत्ता, अंतराळ क्षेत्र, संरक्षण, ड्रोन, जैव तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रात सहकार्य होऊ शकतं.
तंत्रज्ञान, संरक्षण सारख्या क्षेत्रात बेंगळुरू अग्रणी असल्यानं, तसंच हिंदुस्तान एअरोनॉटीक्स लिमिटेड सारख्या संस्था इथं आसपास असल्यामुळे, भारत आणि अमेरिका दोघांनाही बेंगळुरूमधील वाणिज्य दूतावासाचा फायदा होईल, असंही ते म्हणाले. बेंगळुरू इथला वाणिज्य दूतावास व्यवसाय, शैक्षणिक संस्था, तंत्रज्ञान कंपन्या आणि सर्वसामान्य लोकांना मदत करेल आणि नवीन वाणिज्य दूतावास लवकरच इथं व्हिसा सेवा सुरू करेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
जगाशी संबंध वाढवल्यामुळे भारत देशभरात त्यांचे वाणिज्य दूतावास उघडण्यासाठी प्रयत्न करत आहे. भारत लवकरच लॉस एंजेलिसमध्ये आपले वाणिज्य दूतावास उघडणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेटी आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.