अदानी समूहाचं कथित लाचखोरी प्रकरण तसंच संभल हिंसाचार यांच्यासह विविध मुद्द्यांवर विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आज सलग पाचव्या दिवशीही संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं.
लोकसभेत आज कामकाज सुरू झाल्यानंतर काँग्रेस, समाजवादी पार्टी, द्रमुक आणि इतर पक्षाच्या नेत्यांनी घोषणाबाजी करायला सुरुवात केली. सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नात्तराचा तास घ्यायचा प्रयत्न केला. दरम्यान विरोधकांनी आपल्या मुद्द्यांवरून सभापतींना स्थगन प्रस्ताव सादर केला, तो बिर्ला यांनी फेटाळून लावला. सभापतींनी वारंवार चर्चेची विनंती करूनही गदारोळ सुरूच राहिल्याने लोकसभेचं कामकाज आधी १२ वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब झालं.
राज्यसभेतही विरोधकांनी अदानी, संभल तसंच मणिपूर या विषयांवरून स्थगन प्रस्ताव सादर केला. मात्र, अध्यक्ष जगदीप धनखड यांनी तो फेटाळला. त्यानंतर विरोधकांचा गदारोळ कायम राहिल्यानं राज्यसभेचं कामकाजही दिवसभरासाठी तहकूब झालं.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सुरू असलेला गोंधळ थांबवण्यासाठी लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी आज दुपारी संसद भवनात विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची बैठक घेतली. यावेळी बिर्ला यांनी सर्व नेत्यांना सभागृहाचं कामकाज सुरळीतपणे चालवण्याची विनंती केली. त्यावर सर्व नेत्यांनीही यासाठी सहमती दर्शवली. या बैठकीला काँग्रेसचे गौरव गोगोई, तृणमूल काँग्रेसचे कल्याण बॅनर्जी, टीडीपीचे लवू श्रीकृष्ण देवरायालू, डीएमकेचे टी. आर. बालू, राष्ट्रवादी काँग्रेस शरच्चंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे, सपाचे धर्मेंद्र यादव, जदयूचे दिलेश्वर कामैत, राजदचे अभय कुशवाह, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अरविंद सावंत उपस्थित होते.