भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरु झालेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना रंगतदार अवस्थेत पोचला आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाचा संघ ७ बाद ६७ असा अडचणीत सापडला आहे. तत्पूर्वी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या भारतीय संघाचा पहिला डावही अवघ्या १५० धावांत गडगडला. मात्र भारतीय संघ अद्यापही ८३ धावांनी आघाडीवर आहे.
भारतीय संघाच्या डावाला आकार देण्यात नवोदित नितीश कुमार रेड्डीनं मोलाची भूमिका बजावली. ४१ धावांचं योगदान देणाऱ्या नितीश कुमार व्यतिरिक्त अन्य कोणताही भारतीय फलंदाज विशेष प्रभाव पाडू शकला नाही. भारतीय संघाची गोलंदाजी मात्र आज प्रभावी ठरली. हंगामी कर्णधार जसप्रीत बुमरानं ४ फलंदाज बाद करत सामन्यात रंगत आणली आहे.