भारत आणि ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बॉर्डर – गावस्कर चषक क्रिकेट कसोटी मालिकेतल्या ब्रिस्बेन इथं सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात फॉलोऑन टाळण्यात भारताला यश आलं. मात्र आज चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारत पहिल्या डावात अजूनही १९३ धावांनी पिछाडीवर आहे.
आज सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतानं कालच्या ४ बाद ५१ धावांवरून आपला पहिला डाव पुढे सुरू केला. मात्र कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा अपयशी ठरला. केएल राहुल आणि आणि रवींद्र जडेजा यांच्या लढाऊ अर्धशतकी खेळींनी भारताचा डाव सावरला, त्यानंतर अखेरच्या गड्यासाठी जसप्रित बुमराह आणि आकाशदीप यांनी नाबाद ३९ धावांची भागिदारी करत भारताला फॉलोऑनच्या संकटातून बाहेर काढलं. अपुऱ्या प्रकाशामुळे आजच्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा भारताच्या पहिल्या डावात ९ बाद २५२ धावा झाल्या होत्या.