भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या मेलबर्न इथं सुरू असलेल्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात, तिसऱ्या दिवसअखेर भारतानं आपल्या पहिल्या डावात, ९ बाद ३५८ धावा केल्या आहेत. पहिल्या डावात भारत अजूनही ११६ धावांनी पिछाडीवर आहे.
सामन्याच्या आज तिसऱ्या दिवशी भारतानं कालच्या ५ बाद १६४ धावसख्येवरुन आपला पहिला डाव पुढे सुरू केला. मात्र काल नाबाद असलेले ऋषभ पंत २८ तर रविंद्र जडेजा १७ धावा करून बाद झाले. त्यानंतर नितेश रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी आठव्या गड्यासाठी १२७ धावांची भागिदारी करत, भारताला फॉलोऑनच्या संकटातून बाहेर काढलं. नितेश रेड्डी यानं आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्दीतलं पहिलं शतक झळकावलं. वॉशिंग्टन सुंदर ५० धावांवर आणि त्यापाठोपाठ जसब्रीत बुमराह शून्यावर बाद झाला.
तिसऱ्या सत्रात आधी अपुऱ्या प्रकाशामुळे आणि त्यानंतर पाऊस पडू लागल्यानं उरलेला खेळ होऊ शकला नाही. दिवसअखेर नितेश रेड्डी १०५ तर मोहम्मद सीराज २ धावा करून खेळपट्टीवर टिकून होते.