अवैध फेरीवाले उभे राहणाऱ्या मुंबईतल्या २० ठिकाणांवर मुंबई महानगरपालिका आणि पोलिसांनी कडक आणि कायमस्वरूपी निगराणी ठेवावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यालयानं दिले आहेत. संपूर्ण मुंबईत २० संवेदनशील ठिकाणांवर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केलं असून यामुळे याभागातल्या रस्त्यांवर नागरिकांना चालणं मुश्किल झाल्याचं नोंदवत न्यायालयानं राज्य सरकार आणि पोलिसांच्या कामकाजाच्या पद्धतीवर ताशेरे ओढले. दरम्यान, फेरीवाले शहर समितीची निवड होऊन या समितीनं वैध फेरीवाले नोंदवल्यानंतर अवैध फेरीवाल्यांचा प्रश्न सुटेल, असं फेरीवाल्यांच्या संघटनेची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी न्यायालयात सांगितलं. १२ डिसेंबरला फेरीवाल्यांच्या संघटनेनं सादर केलेल्या तपशिलावर न्यायालय विचार करणार असून तोवर या जागांवर निगराणी ठेवण्याचे निर्देश न्यालयानं दिले. तसंच ही कारवाई करताना परवानाधारक फेरीवाल्यांना जागेवरून उठवू नये असंही स्पष्ट केलं.
Site Admin | November 13, 2024 2:28 PM | अवैध फेरीवाले | मुंबई उच्च न्यालय | मुंबई महानगरपालिका